बांगलादेशातून मुंबईत अवघ्या 500 रूपयांत ! घुसखोरी थांबेना
By मनीषा म्हात्रे | Published: July 24, 2023 12:33 PM2023-07-24T12:33:02+5:302023-07-24T12:33:09+5:30
दीड वर्षात २२३ अटकेत; ४६ जणांना पाठवले मायदेशी
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचा वेग वाढत आहे. बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने सीमारेषा ओलांडून भारतात येत असल्याचे चौकशीत समोर येत आहे. गेल्या दीड वर्षात २२३हून अधिक जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे, तर शिक्षामुक्त झालेल्या ४६ बांगलादेशींना मायदेशी पाठविण्यात आले आहे.
गेल्या आठवड्याभरात नागपाडा, शिवडी, आरएके, भायखळा, दादर पोलिसांनी बांगलादेशींविरुद्ध गुन्हे नोंदवत अटकेची कारवाई केली आहे. शिवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन बांगलादेशींकडे चक्क भारतीय कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा १ च्या आय विभागासह मुंबई पोलिसांकडून कारवाई सत्र सुरू आहे.
भाजयुमाेचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना आय शाखेने दिलेल्या अहवालानुसार, २०२२ मध्ये आया शाखामध्ये १७ गुन्हे दाखल झाले. त्यात ३९ जणांना अटक करण्यात आली.
पाठोपाठ पोलिस ठाण्यात ७९ गुन्हे नोंदवत १०० जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. एकूण १६४ गुन्हे नोंदवत २२३ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. २०२२ व २०२३ मध्ये सजामुक्त बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे. ४६ बांगलादेशी नागरिकांना त्यांची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर सीमा सुरक्षा दल बांगलादेशकडे प्रत्यार्पण केले आहे.
मुंबईत येऊन बनला अरबी शिक्षक
शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून अरशुदर उर्फ इरशाद या बांगलादेशी घुसखोराला अटक केली आहे. बांगलादेशातील मैझदीचा रहिवासी असलेला अरशुदर हा गेल्या १५ वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून, तो कपडे विक्रीचा व्यवसाय करण्यासोबत मुलांना अरबी शिकवण्याचे काम करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
आठ वर्षांचा असताना गाठली मुंबई
देवनार पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजू शेख नावाच्या ३५ वर्षीय बांगलादेशी घुसखोराला बेड्या ठोकण्यात आल्या.
बांगलादेशातील बसतपूरचा रहिवासी असलेला राजू हा अवघ्या आठ वर्षांचा असताना घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. तेथून मुंबईत येऊन तो येथेच वास्तव्यास आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह चालवत असल्याचे पोलिस तपासात आढळले.
असे मिळवतात भारतीय पुरावे...
बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा राज्य दहशतवादविरोधी पथकाने यापूर्वी पर्दाफाश करत केलेल्या कारवाईत अटक आरोपींनी सात वर्षांत ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचे समोर आले आहे. अटक केलेला रफीक शेख अर्जदाराच्या कागदपत्रांपैकी बनावट भाडेकरार, बनावट शपथपत्र तयार करून पॅन कार्ड तयार करून घेत असे. त्यानंतर अर्जदाराच्या पॅन कार्डच्या आधारे आधार कार्ड तयार करून घ्यायचा. पुढे पासपोर्टसाठी लागणारा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेचा दाखला आदी कागदपत्रे बनावट तयार करून त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज करत असल्याचे समोर आले होते.