Join us  

क्लस्टर किचनमधून रेल्वे प्रवाशांनो, तुम्हाला मिळतील दर्जेदार, स्वच्छ खाद्यपदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 6:14 AM

आयआरसीटीसीची देशभर १००० ठिकाणी क्लस्ट किचन; वंदे भारतसह अनेक सुपरफास्ट गाड्यांमध्ये सेवा

महेश कोले

मुंबई - मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील लोकमत न्यूज नेटवर्क खाद्यपदार्थांच्या दर्जात आणखी सुधारणा व्हावी या उद्देशाने भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या वतीने देशभर सुमारे एक हजार समूह स्वयंपाकगृहे (क्लस्ट किचन) उभारण्यात येत आहेत. क्लस्ट किचनद्वारे वंदे भारत, दुरांतो एक्स्प्रेस, राजधानी, जनशताब्दी, तेजस यांसारख्या सुपरफास्ट मेल तसेच अन्य काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्यात येणार आहेत. सध्या प्राथमिक स्थरावर लांबपल्ल्याच्या ५७ गाड्यांमध्ये क्लस्ट किचनद्वारे खाद्यपदार्थांचा पुरवठा सुरू आहे.

एक हजार क्लस्टर किचन्सपैकी २२७ किचन्स पश्चिम रेल्वेच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करतील. आतापर्यंत ९० किचन्सना प्रमाणित केले असून त्यापैकी ५० किचन कार्यान्वितही झाले आहेत. मुंबईतील कुर्ला, कॉटन ग्रीन, चेंबूर, ठाणे, पनवेल येथे अशा प्रकारची क्लस्टर किचन्स सुरू करण्यात आली आहेत. या किचन्समधील खाद्यपदार्थ इन्सुलेटेड (हवाबंद) गाडीमधून रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

मानवी हस्तक्षेप कमी करणार खाद्यपर्धाबाबतच्या अनेक प्रकारच्या सरासरी ३५० तक्रारी रेल्वेकडे दररोज येत होत्या. त्याची दखल घेऊन प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ वेळेत मिळावेत यासाठी आधुनिक किचन बनविण्यात येत आहेत. मानवी हस्तक्षेप कमी करून स्वच्छता राखण्यासाठी क्लस्टर किचनमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात येत आहेत.

तक्रारी निम्म्यावर...

आता स्वयंपाक तयार करण्यासाठी 'आयआरसीटीसी'ने अटी व नियम लागू केले आहे. त्यामुळे नव्या किचनमधून दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्यात येतात. परिणामी, खाद्यपदार्थांबाबतच्या तक्रारींचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला.

दर्जा असा राखणार

■ स्वयंपाकगृहावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ■ बेस किचन ते स्टेशनपर्यंत वाहतुकीसाठी इन्सुलेटेड/वातानुकूलित फूड व्हॅनचा वापर ■ वेळोवेळी कीटक नियंत्रण, स्वच्छतेला प्राधान्य ■ शिजवलेल्या अन्नाच्या नमुन्यांची नियमितपणे तपासणी ■ ब्रेड, लोणी, दही इ. बंद पाकिटातील खाद्यपदार्थांची अंतिम मुदत तपासून वापर