नगरसेवक ते CM... बाळासाहेबांचा आदेश आला अन् मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 07:41 AM2024-02-23T07:41:18+5:302024-02-23T08:25:29+5:30
शिवसेनेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभा सभापती असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षाचा काळ आठवला असून शिवसेना परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. शिवसेना आज दोन गटात विभागली असली तर प्रत्येक शिवसैनिकांमध्ये जोशी यांचे स्थान अढळ होते. शिवसेनेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभा सभापती असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
राज्यात १९९५ मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर दिवंगत नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना संधी असतानाही स्वत: मुख्यमंत्री न होता, त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे ठरवले. त्यावेळी, डॉ. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नावे स्पर्धेत होती. अखेर, बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींचं नाव इतिहासात लिहिलं गेलं.
मुंबई महापालिकेत क्लर्कपदी नोकरीस असलेल्या मनोहर जोशींनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे १९९९ ते २००२ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये ४ वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर केवळ बाळासाहेबांच्या दोन ओळीच्या आदेशावर त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं.
मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. राणेंनी आपल्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यापूर्वीच्या काळाचं वर्णन केलं आहे. 'मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत' अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणेंनी लिहलं आहे. '१९९५-१९९७ या काळात साहेबांनी जोशींच्या नेतृत्वातील सरकारमधील गरज नसलेल्या लालफितशाहीवर सामनातून टीका केली होती. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा ३३ वरुन १० वर आल्यावर युतीचे सरकार टिकण्यासाठी जोशीजींना पदावरुन काढणे गरजेचे असल्याचं त्यांना वाटू लागलं', असेही राणे पुस्तकातून सांगितलं आहे.
पुस्तकात पुढे राणे सांगतात, "एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. तेथे उद्धवजीही उपस्थित होते. तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले, जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का?
मी म्हणालो, साहेब फक्त चालवणार नाही, दौडवणार."
दुसऱ्या दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही नेहमी जोशीजींच्या जागी मला घेण्याचं बोलता पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही, असं का? तेव्हा बाळासाहेबांनी आपले सचिव आशीष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला, असे राणेंनी आपल्या पुस्तकातून सांगितलं आहे.
''तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. कृपया त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.'', से ते केवळ दोन-तीन ओळींचे पत्र होते.
दरम्यान, बाळासाहेबांच्या आदेशाचे पत्र मिळताच, मनोहर जोशींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
जोशींनी राजीनाम्याबाबत सांगितलं
दरम्यान, मनोहर जोशींनी लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलताना राजीनाम्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी, गैरसमजातून माझ्याकडून राजीनामा घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं, पण बाळासाहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं, असेही ते म्हणाले होते. ''१९९९ साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. १९९५ साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.'', असे जोशींनी सांगितले होते.