Join us  

निवडणुकीच्या कामापासून स्वयंपाक करेपर्यंत; विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार तरी कशी?

By अतुल कुलकर्णी | Published: August 30, 2024 5:42 AM

शिक्षणाचे मुख्य काम सोडून शिक्षकांना आम्ही कोणती कामे करायला सांगत आहोत? याचा जर हिशोब मांडला तर वेगळे चित्र समोर येते. 

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीच्या कामापासून ते विद्यार्थ्यांना स्वयंपाक करून जेऊ घालण्यापर्यंतची सगळी कामे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी करायची. त्यासोबतच विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षणही द्यायचे. मतदार याद्या तयार करण्यापासून ते निवडणुकीचे कोणतेही काम सगळ्यात आधी शिक्षकांना सांगितले जाते. 

अशा स्थितीत शिक्षक लोकसंख्या गणना, निवडणूक कामात अडकले तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी सुधारणार? असा सवाल विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण सल्लागार सुदाम कुंभार यांनी उपस्थित केला आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकांना सातत्याने अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवायचे तर शैक्षणिक व्यावसायिक विकासासाठी त्यांना वेळ कधी मिळणार असेही त्यांचे म्हणणे आहे.या ठिकाणी लक्ष्मण देशपांडे यांच्या पत्नीसोबत जर्मनीत आलेला अनुभव दिला आहे. आजही जर्मनीमध्ये शिक्षकांना प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. शिक्षक हा त्यांच्यासाठी भावी पिढी घडवणारा शिल्पकारच. हे वास्तव एकीकडे आणि आम्ही सध्या काय करत आहोत? आमच्या शिक्षकांना आम्ही कसे वागवत आहोत? शिक्षणाचे मुख्य काम सोडून त्यांना आम्ही कोणती कामे करायला सांगत आहोत? याचा जर हिशोब मांडला तर वेगळे चित्र समोर येते. 

शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त शेकडो कामे करावी लागतात. माता- पालक संघ, शिक्षक -पालक संघ, शालेय रंगरंगोटी, सुवर्ण महोत्सवी ऑडिट, चार टक्के सादिल ऑडिट, शालेय पोषण ऑडिट, मुलांचे बँकेत खाते उघडणे, निवडणुकीची ड्युटी, निवडणुकीसाठीची मीटिंग, परसबाग निर्मिती, खानेसुमारी, दाखल पात्र मुले, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण, स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध, आंतरराष्ट्रीय योग दिन, शाळा विकास आराखडा राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आणि केलेले काम, त्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करायचे, फोटो अपलोड केले म्हणून पुन्हा जिल्हा परिषद- पंचायत समितीत जाऊन सांगायचे, आम्हाला मिळाले नाहीत असे उत्तर आले की त्याची हार्ड कॉपी नेऊन द्यायची, अशी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास याविषयी शिक्षकांना वेळ मिळतो का याचा विचार सरकारने केला आहे का?

कुठे जर्मनी आणि कुठे महाराष्ट्र..?फ्रैंकफर्ट विमानतळावरची एक घटना. वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे आणि त्यांच्या पत्नी विमानतळावर होत्या. त्यांना त्यांचे तिकीट सापडत नव्हते. विमानतळावरील जर्मन माणूस त्यांचे ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्यावेळी तेथे दुसरा अधिकारी आला. तुम्ही काय करता, असे त्याने सौ. देशपांडे यांना विचारले. आम्ही दोघेही टीचर आहोत, असे त्यांनी सांगताच त्या अधिकाऱ्याचा स्वर एकदम बदलला. त्याने तीन-चार वेळा त्यांची माफी मागितली. कॉफी प्यायला दिली. विमानात बसल्यानंतरही तो भेटायला आला. त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून म्हणाला, मी खूप मोठी चूक केली. एका शिक्षकाशी वाद घातला. माझा येशू मला माफ करणार नाही. तुम्ही तुमच्या देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा... अशी विनवणी करू लागला.

टॅग्स :शिक्षकशिक्षण