भोंग्यांपासून झेंड्यांपर्यंत, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आणि मनसेवर थेट हल्लाबोल, हिंदुत्वावरून सुनावले खडेबोल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 01:33 PM2022-05-01T13:33:31+5:302022-05-01T13:34:18+5:30
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे नेतेही आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे आणि मनसेवर थेट हल्लाबोल केले आहे.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आज औरंगाबाद येथे होणाऱ्या बहुचर्चित सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे नेतेही आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे आणि मनसेवर थेट हल्लाबोल केले आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बोचरी टीका करत खडेबोल सुनावले आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वीकार केलेले राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणकोणते खेळ करताता हे लोकांनी अनुभवलं आहे.कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ तर असे खेळाडू असतात ना असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सारे काही बंद होते. आता कुठे जनजीवन रुळावर येत आहे, अशा परिस्थितीत फुकटात करमणूक पाहायची असेल तर ती का नाही पाहायची, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेला हिंदुत्वाची ओळख लपवायची गरज नाही, मी विधानसभेतही हिंदुत्वाबाबत बोललोय. आता नवीन नवीन हे करून पाहू, ते करून पाहू, अशी मंडली आली आहे. मार्केटिंगचा जमाना आहे. हिंदुत्वाच्या गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा विचार केला जातोय. असले भोंगेधारी पुंगीधारी खूप पाहिले आहे. त्यामुळे हिंदूंना सर्वकाही समजतं. कधीतरी आम्ही मराठी म्हणायचं आणि बाकीच्यांना हाकलून द्यायचं. ते फसल्यावर परत आम्ही हिंदू म्हणून त्यांना पुन्हा बोलवायचं, याला माकडचाळे म्हणतात, असा बोचरा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात हिंदुत्वाचे तीन तीन दावेदार उभे राहिल्यावर शिवसेना आपली हिंदुत्ववादी ओळख दाखवण्यासाठी काय करणार अशी विचारणा केली असता उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचं हिंदुत्व ओळखण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्हाला हिंदुत्वाचा डंका वाजवावा लागत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
तुम्हाला नवनवी ओखळ घ्यावी लागते. वेगवेगळे झेंडे फडकवावे लागतात. पण आम्ही कधीच आमचा झेंडा बदलला नाही आहे, असा टोलाही त्यांनी आपले झेंडे बदलणाऱ्या मनसेला लगावला.