कजरी लोकगीतातून भ्रष्टाचाऱ्यांना 'क्विट इंडिया'चे आव्हान; मराठी, गुजराती, भोजपुरी भाषेतून गीत सादरीकरण
By मनोहर कुंभेजकर | Published: August 11, 2023 01:12 PM2023-08-11T13:12:40+5:302023-08-11T13:14:07+5:30
या महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे..
मुंबई: श्रावण महिन्यात उत्तर भारतात कजरी लोकगीत गाण्याची परंपरा आहे. त्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या 'एक भारत - श्रेष्ठ भारत' संकल्पनेला समर्पित कजरी महोत्सव विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १० दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरात हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भोजपुरी भाषेत संजोली पांडे, गुजराती भाषेत जितू भानुशाली आणि मराठीत जयंत पिंगुळकर यांनी गाणी सादर करत भ्रष्टाचाऱ्यांना 'क्विट इंडिया' चे आव्हान केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकतेचा आवाज बळकट होताना दिसला. अयोध्येहून आलेल्या गायिका संजोली पांडे यांनी मराठी गाणी सादर केली तर मराठी गायक ब्रह्मानंद पाटणकर यांनी भोजपुरी गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की , प्रत्येक राज्यातील नागरिक स्थानिक भाषा आणि संस्कृती स्वीकारतील तेव्हाच सशक्त राष्ट्राची निर्मिती करता येईल. भोजपुरी भाषिक मराठी-गुजराती गाण्यांचा आस्वाद घेत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. संस्कृतीचे जतन करूनच राष्ट्र एकसघ राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले. प्रयागराजचे महापौर गणेश केसरवानी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी दीपक त्रिपाठी यांनी भोजपुरी, बी. के. सामंत यांनी कुमाऊनी गाणी तर नृत्य विशाखा ग्रुपने गाणी सादर केली. कार्यक्रमात आवदा फाउंडेशनच्या सिंदूर विनीत मित्तल आणि लेखिका-कवयित्री इरा टाक यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी स्त्री शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. सोमा घोष यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला नवी उंची दिली.