नवी मुंबईला पोहोचणे मुंबईकरांना सुलभ! मुंबईतून मेट्रोने चला कल्याण - तळोजाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:36 AM2023-12-08T09:36:20+5:302023-12-08T09:37:26+5:30
कल्याण तळोजा ही मेट्रो १२ मार्गिकेचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई : शहरवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण शहर उपनगरात मेट्रोचे जाळे विणत आहे. कल्याण तळोजा ही मेट्रो १२ मार्गिकेचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मेट्रोच्या इतर मार्गिकांमुळे ठाणे तसेच नवी मुंबईला पोहोचणे मुंबईकरांना सुलभ होणार आहे.
एमएमआरडीएने कल्याण ते तळोजा या प्रस्तावित कारशेडच्या बांधकामासाठी १ हजार ८७७ कोटींची निविदा मेट्रोने काढली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मेट्रो १२ च्या बांधकामाला सुरुवात होईल. कारशेडसाठी ४७ हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे.
ठाणेपल्याडची शहरे जोडणार :
एमएमआरडीएने मुंबईसह ठाणेपल्याडची शहरे मेट्रो मार्गिकांनी जोडण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो १२ द्वारे आणि इतर मेट्रो मार्गिकांमुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबईशी कनेक्ट होणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो १२ या मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला एमएमआरडीएकडून लवकरच सुरुवात केली जाणार असून या मार्गिकेत १७ स्थानके असणार आहेत.
ही आहेत स्थानके :
कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसर्वे आगार, पिसर्वे, अमनदूत आदी स्थानके मेट्रो १२ मार्गिकेवर नियोजित आहे.
२० किमी अंतराची उड्डाण मेट्रो !
ही मेट्रो मार्गिका २० कि.मी. लांबीची असून ती पूर्णपणे एलिव्हेट असणार आहे.
एकूण ५ हजार ६०० कोटी खर्चाद्वारे मेट्रो १२ ही मार्गिका बांधली जात आहे. या प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाचे काम गेल्या वर्षी एमएमआरडीएने पूर्ण केले होते.
ऑक्टोबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मेट्रोने डोळ्यासमोर ठेवले आहे.