चहावरून राजकारणाला उकळी; बावनकुळेंना विरोधकांसह सोशल मीडियाने केले लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 07:59 AM2023-09-26T07:59:38+5:302023-09-26T08:00:17+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विरोधकांसह समाजमाध्यमांनी केले लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘विरोधात बातम्या न येण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या’, महाविजय २०२४ पर्यंत एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या’ अशी विधाने केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षांनी तर त्यांच्यावर सडकून टीका केलीच; पण समाजमाध्यमांनीही त्यांच्यावर निशाणा साधला.
अहमदनगर येथे रविवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी केलेल्या विधानांची बातमी ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, की बावनकुळे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये. बावनकुळे व्यंगात्मक बोलले आहेत. त्यांचा हेतू चुकीचा नव्हता. राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी व्यंगात्मक बोलत असतात.
माफी मागा, बावनकुळेंवर विरोधकांचा हल्लाबोल
पत्रकारांचा अपमान केल्याबद्दल बावनकुळे यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पत्रकारांना ढाब्यावर बोलावून संविधान आणि लोकशाहीला धाब्यावर बसविले जात असल्याचा टीका त्यांनी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजतात का, असा सवाल करत उद्या तुम्ही मतदारांनाही चिरीमिरी द्यायला मागेपुढे पाहणार नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी लोकमतमधील वृत्ताचा हवाला देत ट्वीट केले असून पत्रकारांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्षच कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आपण सर्वांना विकत घेऊ शकतो या भ्रमातून बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली असावी. माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले नाहीत.