1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, राणे-केसरकर संघर्ष टोकाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 09:18 AM2022-08-07T09:18:16+5:302022-08-07T09:19:11+5:30
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
मुंबई - बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उल्लेख करत पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे केसरकर यांनी सांगितले. त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत राणे कुटुंबांवर प्रहार केला होता. त्यानंतर, नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकरांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे, राणे-केसरकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिले. आम्ही हिंदुत्त्वासाठी एकत्र आलो आहोत, हिंदुत्त्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं होतं. आता, माजी खासदार आणि दुसरे राणेपुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन दिपक केसरकर यांना टोला लगावला आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, अशा शब्दात निलेश राणेंनी दिपक केसरकर यांना टोला लगावला आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
नितेश राणे काय म्हणाले
महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. हिंदुत्ववाचा विचार आजून प्रखर झाला पाहीजे. यासाठी 166 आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, येवढेच मी सांगतो, असे नितेश राणे म्हणाले.
काय म्हणाले होते केसरकर
नारायण राणे यांच्यामुळे युती फिसकटल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचे व्यासपीठ वापरून राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यासाठी राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला आणि त्यानंतर दोघांची भेट झाली, असा दावा केसरकर यांनी केला होता.
केसरकरांना आवर घाला - राजन तेली
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर हे नको ती आणि चुकीची विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही देणार आहोत. भाजप नेत्यांवर केसरकरांनी बोलू नये. त्यांना तो नैतिक अधिकार नाही असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केसरकरांना दिले. कणकवली येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.