'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी'; शिंदे गटाकडून स्फूर्तीगीत रिलीज, गुलाबराव पाटलांची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:34 PM2022-10-04T17:34:36+5:302022-10-04T17:39:14+5:30
संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
मुंबई: शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याची उत्सुकता केवळ राज्यात नसून देशभरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे.
आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. "हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी या गीताबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा
या गीताच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास हे या स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. उद्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे स्फूर्तीगीत लाँच करत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल. अन् शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
शिवसेनेचं नवं स्फूर्तिगीत माझी आणि प्रभारंग फिल्म्स् ची निर्मिती
— Gulabraoji Raghunath Patil (@GulabraojiP) October 4, 2022
निर्माते संदिप माने, कार्यकारी निर्माते उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, गायक आदर्श शिंदे यांची कलाकृती..
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांना एका शिवसैनिकाने दिलेली अनोखी मानवंदना pic.twitter.com/uEW6pfPEqf
दरम्यान, यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी या- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यक्तीशः कामाचा आढावा घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आम्ही सारे विचारांचे वारसदार असून एका सच्चा हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-
निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"