Join us

वाढीव वीज बिलाविरोधात मोर्चा

By admin | Published: October 30, 2015 12:35 AM

गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंसह वीज बिलांंमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वच वीज कंपन्यांनी विजेचे दर दुप्पट केल्याने सामान्य जनतेच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंसह वीज बिलांंमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वच वीज कंपन्यांनी विजेचे दर दुप्पट केल्याने सामान्य जनतेच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे. याचाच निषेध करण्यासाठी गुरुवारी चेंबूरमधील काही रहिवाशांनी रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला. दरवाढ तत्काळ कमी न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा देण्यात आला.भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वच वस्तू स्वस्त होतील, अशी नागरिकांना आशा होती. मात्र पूर्वीच्या सरकारप्रमाणेच या सरकारनेदेखील सामान्य जनतेवर महागाईचा बोजा टाकून त्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना गेल्या तीन महिन्यांपासून विजेचे बिल दुप्पट येऊ लागले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला या सरकारने खऱ्या आर्थाने शॉक दिला आहे. टाटा, रिलायन्स, बेस्ट आणि महावितरण या सर्वच कंपन्यांनी अचानक बिल वाढवल्याने नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने तत्काळ यामध्ये मध्यस्थी करून विजेचे दर कमी करावे, अशी मागणी चेंबूरमधील रहिवाशांकडून करण्यात आली आहे. यासाठी आज घाटले गाव परिसरातील शेकडो रहिवाशांनी टिळक नगरातील रिलायन्स कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच येथील अधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ हे दर कमी करण्याची मागणी केली असून दर कमी न झाल्यास कार्यालयासमोच उपोषण करण्याचा इशारादेखील रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)