Video:...अन् चक्क मुख्यमंत्र्यांसमोर पत्नी अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं गाणं; काय आहे नेमकं सत्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 08:54 AM2019-09-27T08:54:19+5:302019-09-27T08:56:03+5:30
या व्हिडीओची छेडछाड करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करुन राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. भारतीय जनता पार्टीने सध्या सोशल मीडियाच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपापाठोपाठमनसे, राष्ट्रवादी, शिवसेनाही प्रचारात उतरली आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारणही तसेच आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस चक्क मुख्यमंत्र्यांसमोर मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ आहे. मनसे आणि भाजपा हे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. यामध्ये अमृता फडणवीस मनसेचं गाणं म्हणतायेत तर मुख्यमंत्री त्या गाण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात.
याबाबत सत्यता पडताळली असता हा व्हिडीओ मुंबई पोलिसांचा उमंग 2018 या कार्यक्रमातील असल्याचं समोर आलं. यामध्ये अमृता फडणवीस 'फिर से' हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओची छेडछाड करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अशाप्रकारे व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात. भाजपाने सोशल मीडियाच्या प्रचारातून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोधी पक्षातील कार्यकर्तेही भाजपावर निशाणा साधण्याची संधी सोडताना दिसत नाही.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे. भाजपाने रम्याचा डोस या काल्पनिक पात्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. कोहिनूर मिल कथित घोटाळ्यात ईडीची चौकशी झाल्याचा उल्लेख करत भाजपाने राज ठाकरेंना कोट्याधीश जादूगर अशी उपमा दिली होती. तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही पीएमसी बँकेबाबत सामान्यांना त्रास झाल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एक्सिस बँकेत खातं उघडावं, आपली बँक, वहिनीची बँक असं म्हणत भाजपावर पलटवार केला आहे.