दादरमध्ये भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या पोलिसाला मारहाण
By admin | Published: March 18, 2017 04:26 AM2017-03-18T04:26:48+5:302017-03-18T04:26:48+5:30
दादरमध्ये टॅक्सीचालक आणि कारचालकामध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या पोलिसालाच कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली.
मुंबई : दादरमध्ये टॅक्सीचालक आणि कारचालकामध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलेल्या पोलिसालाच कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पवन नाईकवडे (२३) या तरुणाला दादर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे.
कल्याण येथील रहिवासी असलेले अविनाश पाटील (३८) दादर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री उशिराने दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्ग येथे दादर पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. याच दरम्यान कारमधून घरी चाललेल्या पवन याचा टॅक्सीचालकासोबत वाद सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पाटील दोघांना समजाविण्यासाठी पुढे गेले.
या वेळी दारूच्या नशेत असलेल्या नाईकवडेने त्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)