मुंबई : एकीकडे भाजपाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसने चोप दिला आहे.
बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच अश्लील नाच करून दाखवत 'मोदी मोदी'च्या घोषणा दिल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. यामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
उर्मिला मातोंडकर या रेल्वे स्थानक आवारात प्रचार करत होत्या. यावेळी अचानक 8 ते 10 जण त्याठिकाणी आले. त्यांनी उर्मिला यांच्यासमोरच वेडावाकडा नाच केला. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक पॅसेंजर महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली. यानंतर बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, उर्मिला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे सर्व आपल्या प्रचारादरम्यान भीती पसरविण्यासाठी केले जात आहे. ही फक्त सुरुवात आहे. पुढे हा प्रकार हिंसक वळण घेईल. माझ्या जीवाला धोका असून पोलिसांकडे संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे, असे सांगितले.
पराभव दिसू लागल्याने भाजपावर आरोपसत्र
उर्मिला मातोंडकर यांच्या पाया खालची वाळू सरकली असून पराभव त्यांना दिसू लागल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप त्या करत आहेत. 2014 झाली गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा 4,46000 मतांनी दारुण पराभव केला होता. आता त्यांचा यापेक्षा जास्त मतांनी पराभव होणार असल्याने त्या बिनबुडाचे आरोप करत आहे, असे उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष विनोद शेलार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.