Join us  

पाण्यासाठी एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा

By admin | Published: March 15, 2016 12:45 AM

गेल्या अनेक दिवसांपासून चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील अनेक भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी दाखल करूनदेखील पालिका दुर्लक्ष करत आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील अनेक भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी दाखल करूनदेखील पालिका दुर्लक्ष करत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज येथील रहिवाशांनी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी, यासाठी रहिवासी आक्रमक झाले होते. शंभर टक्के झोपडपट्टी परिसर असलेल्या पी. एल. लोखंडे मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या समस्येत भर पडली आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना पुरेसा पाणी मिळत नाही. रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातच काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांना हेच पाणी पिण्यासाठी वापरण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागांत दिवसभरात काही मिनिटेच पाणी येते, त्यामुळे रहिवाशांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविकेसह एम पश्चिम विभागाच्या साहाय्यक आयुक्तांशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र नगरसेविकेसह साहाय्यक आयुक्तांनी देखील या समस्येवर काहीही तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच आज मोर्चा काढल्याचे या वेळी रहिवाशांनी सांगितले. जोपर्यंत हा पाणी प्रश्न सोडवला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला. (प्रतिनिधी)