भाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 03:31 PM2018-10-06T15:31:24+5:302018-10-06T16:39:37+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या मोर्चेबांधणीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र संभाव्य आघाडीबाबत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीबाबत चर्चा झाली आहे. मात्र तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. तसेच वंचित बहुजन आघाडी झाली आहे. काँग्रेसला या आघाडीत यायचे असेल तर त्यांनी विचार करावा असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
तर राजू शेट्टी यांनीही यावेळी भाजपाविरोधात महाआघाडी करण्याचे संकेत देताना रक्ताचा गुलाल करुन निवडणुका जिंकण्याचे काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केला. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच तिसरी आघाडी करण्यापेक्षा 2014 साली गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या महायुतीप्रमाणे एक व्यापक महाआघाडी करणे हिताचे ठरेल, असे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.