फळ मार्केटमध्ये संत्रा, मोसंबीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:21 AM2018-10-05T03:21:22+5:302018-10-05T03:22:10+5:30
ग्राहकांचीही पसंती : संत्र्याचे बाजारभाव मात्र घसरले
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्रा व मोसंबीची आवक वाढली आहे. सप्टेंबरच्या तुलनेमध्ये संत्र्याची चारपट आवक होत असून बाजारभाव घसरू लागले आहेत. मोसंबीची आवक वाढली असली तरी भाव घसरले आहेत. एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये सद्य:स्थितीत पपई व सफरचंदप्रमाणे संत्रा, मोसंबीची आवक वाढू लागली आहे. मार्केटमधील काही विंग संत्रामय होऊन गेल्या आहेत. सरासरी ४० टन आवक होत होती.
गुरुवारी तब्बल १८४ टन आवक झाली आहे. बाजारभावही १२ ते ४२ रुपये किलोवरून ६ ते ३६ रुपये किलो एवढे झाले आहेत. सद्य:स्थितीमध्ये मार्केटमध्ये अमरावती, नगर, शिरूर परिसरातून आवक होऊ लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये १२० रुपये डझन दराने संत्री विकली जात आहेत. मोसंबीची आवकही वाढली आहे. गत महिन्यामध्ये सरासरी १४० टन आवक होत होती. गुरुवारी २४० टन आवक झाली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशमधूनही मोसंबीची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये गत महिन्यामध्ये ४ ते २४ रुपये किलो दराने विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर ७ ते २७ रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये मोसंबी १०० रुपये डझन दराने विकली जात आहे. एपीएमसीमधील व्यापारी महेश मुंढे यांनी सांगितले की, संत्रा व मोसंबी दोन्ही फळांची आवक सुरू झाली आहे. इतर भागातून संत्रा विक्रीसाठी येत असून यापुढे आवक चांगली राहील असे स्पष्ट केले.
संत्रा, मोसंबी आवक तपशील पुढीलप्रमाणे (कंसात बाजारभाव किलोमध्ये)
वस्तू ५ सप्टेंबर ४ आॅक्टोबर
संत्रा ३९९ (१२ ते ४२) १८४०(६ ते ३६)
मोसंबी १४१०(४ ते २४) २४७८ (७ ते २७)