Join us

फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; उद्योजकांकडून 1 रूपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 3:11 PM

जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन

ठळक मुद्देफ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रति बल्क लिटर रू 1 इतके नाममात्र उत्पादन शुल्कजांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहननिर्णयामुळे कोकण पट्टयातील फळ उत्पादकांना होणार फायदा

मुंबई - फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर एक रुपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं आणि करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचा उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या भागातील फलउत्पादकाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. 

द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या 100 टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होतं. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळत असतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका 330 मि.ली बाटलीची किंमत साधारण रू.150 -180 आहे. तर 750 मि.ली ची साधारण टेबल वाईन रू. 250 ते 400 रुपये या दराने बाजारात मिळते. या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ 700 ते 800 पेट्या महाराष्ट्रात विकू शकत होते. या शिवाय गेल्या 2 वर्षात या उद्योगात केवळ 4 नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरीता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरीता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं आणि करवंदं इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाईन/मद्यावर प्रति बल्क लिटर एक रुपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकरले जाणार आहे. या निर्णयामुळे कोकण पट्टयातील फळ उत्पादकांना फायदा होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाईन आणि इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळणार आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रफळे