Join us

इंधन, किराणापाठोपाठ संभाषणही महागले; सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 3:19 PM

एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ केली आहे.

मुंबई : एकीकडे इंधन दरवाढ आणि भाजीपाला महागल्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता दूरसंचार कंपन्यांनीही निराश केले आहे. एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन-आयडिया कंपनीने रिचार्जचे दर वाढविल्याने महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ केली आहे. या दोन्ही कंपन्यांची सेवा वापरायची झाल्यास आता किमान ९९ रुपये मोजावे लागतील. याआधी त्यासाठी ७९ रुपये आकारले जायचे. त्याशिवाय मासिक रिचार्ज १४९ वरून १७९, द्वैमासिक ३९९ वरून ४७९, त्रैमासिक ५९९ वरून ७१९ वर पोहोचले आहे. परिणामी खिशावर ताण पडणार असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याविषयी मालाड येथील गृहिणी शिल्पा बोराडे म्हणाल्या, गेल्या काही महिन्यांत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे घरखर्च भागवताना नाकीनऊ येत आहेत. त्यात आता रिचार्ज वाढल्याने अतिरिक्त ताण सहन करावा लागणार आहे. कालानुरूप मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तो खर्च उचलणे भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात माणसा-माणसांत दुरावा निर्माण झाला असताना मोबाईल हा एकमात्र आधार होता. त्याने भावनिक संदेशवहनाचे काम केले. सगळे विश्व आता आभासी युगात वावरत असल्याने मोबाईल किंवा इंटरनेट हे जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. त्यामुळे कितीही दरवाढ केली तरी माणूस नाईलाजाने सेवा घेणार, हे माहिती असल्याने कंपन्या रिचार्जचे दर वाढवत आहेत, अशी प्रतिक्रिया यश पाटील या युवकाने दिली.

आताच दरवाढ करायला हवी होती का?

एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या तीव्र झळा सोसत असताना मोबाईल रिचार्जची दरवाढ करणे योग्य आहे का, याचा विचार खासगी कंपन्यांनी करायला हवा.महागाई थोडी कमी झाल्यानंतर जर पैसे वाढवले असते तर हरकत नव्हती. सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय कोणीच घेत नाही, जो-तो आपल्या फायद्याचा विचार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अंधेरीतील रहिवासी बबन शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :एअरटेलव्होडाफोन