मुंबई - देशभरात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही बाब आता खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मान्य केली आहे. ''इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे'',अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये मंगळवारी पेट्रोलचे प्रतिलिटर दर 89.54 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर 78.42 रुपये एवढे होते. राज्यातील जवळपास सहापेक्षा अधिक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनतेला जगणं कठिण झाले आहे. याच समस्येवर ब्लूमबर्ग इंडिया इकनॉमिक फोरममध्ये संबोधित करताना नितीन गडकरी यांनी भाष्य केले. ''इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती सर्वसामान्यांना अन्य समस्यांचाही सामना करावा लागत आहे'', असे त्यांनी यावेळेसे म्हटले. दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पण ही माहिती मिळण्याचे स्त्रोत कोणते, हे सांगणे त्यांनी टाळले.
परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरीमध्ये रविवारी पेट्रोलचे प्रतिदर 90 रुपये झाले होते. दरम्यान, 2019मध्येही भाजपाच सत्तेत येणार, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला. ‘‘नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत. आम्ही सर्व मोदीजींसोबत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकांनंतरही तेच आमचे पंतप्रधान असतील'', असेही गडकरींनी म्हटले.
(Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा)
दरम्यान, दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत.
इंधन दरवाढ कमी करण्याच्या दिशेने सरकारकडून काही ठोस पावले उचलण्यात येत आहेत का? कुठे आहेत अच्छे दिन?, असे संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून सरकारला विचारण्यात येत आहेत.