मुंबई - राज्यासह देशभरात इंधन दरवाढीची मालिका सुरूच आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 0.21 पैसे तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात 0.31 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 87.50 रुपये तर डिझेलसाठी 77.37 रुपये मोजावे लागणार आहेत. तर राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलिटर दर 82.03 रुपये आणि डिझेलचे प्रतिलिटर दर 73.82 रुपये एवढे आहेत.
दरम्यान, सरकारने पेट्रोल दरवाढीवरुन जनतेला फसवल्याचे दिसून येत आहे. कारण, 4 ऑक्टोबरला सरकारने 5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करत मोठा गाजावाजा केला. मात्र, तीनच दिवसात पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 91.34 रुपयांवरुन 5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करुन 86.34 रुपयांवर आले होते. पण, तीनच दिवसांत हे दर पुन्हा 87.50 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे तीन दिवसात पेट्रोल 1.16 पैशांनी महागले आहे.
(महागाईच्या निषेधार्थ दुचाकी चक्क स्वच्छतागृहावर, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध )
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणं सुरूच आहे. इंधन दरवाढ आणि महागाईतून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात केली. मात्र इंधन दरवाढीचा भडका उडत आहेच. यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहे. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला ऐंशीचा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विरोधी पक्षही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.