Join us

Fuel Hike : महागाईचा भस्मासूर ! पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.54 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 7:57 AM

Fuel Hike : जनतेच्या मागे लागलेला महागाईचा भस्मासूर कधी पाठ सोडणार, असा निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर सातत्यानं वाढ होत आहे.

मुंबई - जनतेच्या मागे लागलेला महागाईचा भस्मासूर कधी पाठ सोडणार, असा निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आजही पेट्रोलच्या दरात 10 पैसे आणि डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 89.54 रुपये आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 78.42 रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोलची नव्वदीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.  या महागाईला सामोरे कसे जायचे, असा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. 

इंधन दरवाढ कमी करण्याच्या दिशेने सरकारकडून काही ठोस पावले उचलण्यात येत आहेत का? कुठे आहेत अच्छे दिन?, असे संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून सरकारला विचारण्यात येत आहेत.   

दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. 

(Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा)

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मागील 73 दिवसांत 43 वेळा इंधन दरात वाढ केली. 6 जुलै ते 17 सप्टेंबर दरम्यान पेट्रोल 6.31  व डिझेल 6.59 रुपये प्रति लिटरने महागले. फक्त आठ वेळा दरांमध्ये किंचित घसरण झाली. इंधनाचे दर भडकत असल्याने सामान्यांची होरपळ सुरूच आहे. डिझेलवर धावणारे ट्रक, टेम्पो, बसेस यांचे भाडे वाढल्याने दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्य महागले आहे. दुचाकी वापरणाऱ्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

रविवारपर्यंत राज्यात 13  ठिकाणी पेट्रोल नव्वदीच्या पुढे होते. कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल १५ पैसे व डिझेल ६ पैसे महाग केले. त्यामुळे नव्वदीत आणखी तीन शहरांची भर पडली. सातारा (90.01 ), सोलापूर (90.12) व वाशिम (90.01) यांचा त्यात समावेश आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 91.28  रुपये प्रति लिटरसह अद्यापही देशात सर्वाधिक आहे. सोमवारी नांदेडमधील पेट्रोल दरही 91.09  रुपये प्रति लिटरवर पोहोचला. राज्यात चार ठिकाणी डिझेलही 79 रुपयांच्यावर आहे. अमरावती (79.70), औरंगाबाद (79.47), नंदूरबार (79.59 ) व सोलापूर (79.04 ) यांचा त्यात समावेश आहे. मुंबईसह आठ ठिकाणी डिझेल 78 रुपयांहून अधिक आहे. उर्वरित ठिकाणी ते 77 ते 78 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे.

 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल