इंधन दरवाढ बातमी (नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:48+5:302021-02-06T04:10:48+5:30
नवी मुंबई/ पनवेल- इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत कोकण भवन येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला ...
नवी मुंबई/ पनवेल- इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत कोकण भवन येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता, तर ऐरोली येथे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध करीत इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली, तर पनवेलमध्ये जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ठाणा नाका येथून विभागीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध करून प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना निवेदन देण्यात आले. तेथे महिलांनी चुलीवर भाकरी भाजल्या.
-----------------
इंधन दरवाढीविराेधात शिवसेनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : केंद्र सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने पालघरमध्ये विविध तालुक्यांतील तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून सरकारच्या इंधनदरवाढीचा निषेध केला. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्याद्वारे केली.
----------------------
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे अनोखे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मुंब्रासह सर्वच शहरांत शिवसेनेने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. यात कुठे बैलगाडी व सायकल चालवून, तर कुठे चुलीवर भाकरी-चपाती भाजून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात महिला शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. सर्वच ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.