मुंबई: इंधन दरवाढीमुळे होणारी सामान्यांची होरपळ सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 90.22 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातील वाढदेखील सुरुच आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलचा दर 78.69 रुपयांवर पोहोचला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.86, तर डिझेलसाठी 74.12 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत आज डिझेलच्या 10 पैशांची वाढ झाली आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त २९ मे ते ५ जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर ६ जुलै ते २5 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. पण केंद्र व राज्य सरकारचे भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारे कर कमी करून जनतेला दिलासा देण्यास तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.