मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात मोदी सरकारने केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरात रोजच वाढ होताना दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी (12 ऑक्टोबर) पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 29 पैसे प्रतिलिटरने महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 87.94 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 78.51 रुपये झाला आहे.
दुसरीकडे, राजधानी दिल्लीत पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 28 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.48 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 74.90 रुपये वाहनधाराकांना मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, इंधन दरवाढीचा भडका आणि महागाईचे चटके सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहे. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. यामुळे विरोधकांकडून मोदी टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरात कपात केली होती. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढीची मालिका सुरूच आहे.