Join us

कर्नाटक निवडणुकीनेच रोखली इंधन दरवाढ! मात्र केंद्राचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:10 AM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळेच देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय आणि कॉर्पोरेट जगतात सुरू आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मात्र या वृत्तास नकार देत तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवल्याचा खुलासा केला आहे.

- चेतन ननावरेमुंबई  - कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळेच देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय आणि कॉर्पोरेट जगतात सुरू आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मात्र या वृत्तास नकार देत तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवल्याचा खुलासा केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना दरवाढ न रोखणाऱ्या तेल कंपन्या; कच्च्या तेलाचे दर वाढत असताना नफ्यात कपात करून दर स्थिर का ठेवतील? असा सवाल जाणकारांनी उपस्थित केला आहे.देशात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढणारे पेट्रोल व डिझेलचे दर तब्बल गेल्या १५ दिवसांपासून एकाच आकड्यावर येऊन अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र कच्च्या तेलाचे दर वरखाली होत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ झाल्यास त्याचा विपरित परिणाम होण्याच्या भीतीने दरवाढ रोखल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने जरी त्यास नकार दिला, तरी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा महत्त्वाच्या शहरांतही स्थिरावलेले इंधन दर बरेच काही बोलत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.फामपेडा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले की, कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यावर सरकारने इंधन दर कमी केले नाहीत. याउलट इंधनावरील कराच्या टक्क्यांत वाढच केली. त्यामुळे ग्राहकांना फटका बसला. तेल कंपन्यांना फायदा झाला.कच्च्या तेलाचे दर वाढत असताना इंधन दरवाढ केली नाही, तर तेल कंपन्यांच्या नफ्यात कपात होईल. सरकार ग्राहकांचा विचार न करता, स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी तेल कंपन्यांआडून इंधन दराचा वापर करून घेत आहे....तरीही इंधन दरात बदल नाही!- गेल्या १५ दिवसांत ब्रेन्ट क्रूड आॅइलचे दर तब्बल चार वेळा घसरले आहेत. तर गेला आठवडाभर ब्रेन्ट क्रूड आॅइलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.- १५ दिवसांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल रोजी ब्रेन्ट क्रूड आॅइलचे दर ७५.०१ अमेरिकन डॉलर होते. त्यात, २ मेपर्यंत ७३.०३ अमेरिकन डॉलर घसरण झाली.- याउलट दरात चढ-उतार होत असताना बुधवारी ब्रेन्ट क्रूड आॅइलचे दर तब्बल ७६.९६ अमेरिकन डॉलरपर्यंत वाढलेले आहेत.- तरीही देशातील इंधन दर स्थिर आहेत. 

टॅग्स :पेट्रोलसरकारबातम्या