मुंबई: वाढत्या इंधन दरांविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काल काँग्रेसनं भारत बंद पुकारला होता. मात्र यानंतरही इंधनाच्या किमती वाढतच आहेत. आज पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी 88.26 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही 15 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 77.47 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 14 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 80.87 रुपये आणि 72.97 रुपये मोजावे लागतील. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीविरोधात काल काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध केला. देशभरातील भारत बंदचा जोर पाहून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत सर्वसामान्य जनतेच्या त्रासाची आपल्याला कल्पना असल्याचं म्हटलं. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं सरकारच्या हातात नसल्याचं म्हणत त्यांनी हात वर केले.
इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 7:33 AM