इंधन दरवाढीने कंबरडे मोडले! हा तर विषप्रयोग, मुंबईकरांच्या तीव्र भावना, सर्वाधिक दर मुंबईमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:58 AM2017-09-14T06:58:11+5:302017-09-14T06:58:24+5:30
गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर तब्बल १४ रुपयांनी वाढल्याने मुंबईकरांमधून आता सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारकडून मुंबईकरांवर विषप्रयोग सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत दरवाढ मागे घेण्याची मागणी मुंबईकरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
मुंबई : गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर तब्बल १४ रुपयांनी वाढल्याने मुंबईकरांमधून आता सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारकडून मुंबईकरांवर विषप्रयोग सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत दरवाढ मागे घेण्याची मागणी मुंबईकरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत असतानाही पेट्रोलच्या दरात मात्र कमालीची वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात सर्वांत महाग पेट्रोल मुंबईकरांच्या माथी मारले जात आहे. पण दरवाढीचा फायदा पेट्रोलपंप चालक किंवा मालकांना होत नसल्याची माहिती पेट्रोलपंप चालक संघटना फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
लोध म्हणाले की, पारदर्शकतेच्या नावाखाली १६ जूनपासून सरकारने इंधनाचे दर रोज बदलण्याची सक्ती केली. मात्र रोज होणारी दरवाढ ग्राहकांच्या लक्षात येत नाही. याउलट रोज किमती बदलत असल्याने केवळ एकाच दिवसाचा साठा पंपचालक उचलत आहेत. दरवाढीमुळे विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र खरेदीसाठी अधिक गुंतवणूक करावी लागत असल्याने पंपचालकांच्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
ही तर सरकारी नफेखोरी!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना दरवाढ करणे, म्हणजे सरकारी नफेखोरीच बोलावी लागेल. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य वस्तूंचे भावही वाढू लागले आहेत. कोणतेही धोरण सरकारकडे नाही. त्यामुळे सत्तेवर येण्यासाठी सरकारने सांगितलेले ‘अच्छे दिन’ यालाच म्हणायचे का, असा प्रश्न पडतो.
- नितीन सरदेसाई, मनसे नेते
मध्यमवर्गीयांचा विसर
धनदांडग्यांसाठी कोट्यवधीचा महसूल गोळा करणाºया सरकारला मध्यमवर्गीयांचा विसर पडला आहे. विरोधी पक्षात असताना हेच नेते दरवाढीमुळे बोंबाबोंब करत होते. मात्र आता दर कमी करण्याऐवजी मुंबईकरांकडूनच महसूल वसूल करून बुलेट ट्रेन आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- सचिन अहिर,
मुंबई अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस
...हा तर विषप्रयोग!
दर १५ दिवसांनी होणारी दरवाढ प्रत्येक दिवशी करून, मुंबईकरांवर सरकारने विष प्रयोगच केला आहे. भांडवलदारांना झुकते माप, त्यांच्या फायद्याचे निर्णय, बघ्याची भुमिका घेणारा कचखाऊ विरोधी पक्ष, चेहरा आणि कोणीच वाली नसलेला असंघटित ग्राहक आणि जनतेचा अमाप फायदा उठविला जात आहे. इंधन दरवाढ करून, मध्यवर्ती निवडणुकीत ती कमी करण्याची खेळी आता सामान्य माणूस ओळखून चुकलाय. त्यामुळे सरकारने या दरवाढीची रितसर कारणे द्यावी, अन्यथा ती मागे घ्यावी.
- अमितकुमार शिंदे, व्यावसायिक
सामान्यांच्या खिशाला कात्री!
दरवर्षी पेट्रोल दरवाढ होत असली, तरी पगारवाढ होत नाही. मार्केटिंग व्यवसायात असल्याने, कामानिमित्त दुचाकीवरून फिरावे लागते. गतवर्षीच्या तुलनेत पेट्रोलचे दर १४ रुपयांनी वाढल्याने दुचाकीवरून फिरणे परवडत नाही. सततच्या दरवाढीमुळे खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
- वैभव कोलगे, बोरीवली
सरकारने विचार करावा
साउंड आणि डेकोरेटर्सचा व्यवसाय असल्याने, सामानांची वाहतूक करण्यासाठी वाहनाची गरज भासते. दरवाढीमुळे वाहनांना भाड्यापोटी अधिक पैसे द्यावे लागत आहेत. त्यात साउंडवरही सरकारने मर्यादा आणल्याने नुकसान वाढत असून, बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करत, दरवाढ रद्द करावी.
- केतन ओव्हळ, कांदिवली
व्यावसायिकांच्या समस्येत वाढ
आर्थिक विकास वाढवायचा असेल, तर मुख्य दळणवळणाच्या साधनावरील खर्च कमी झाला पाहिजे. वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्च वाढतोय. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना पुरविल्या जाणाºया वस्तूंवर होत आहे. - मंगेश जाधव, भांडुप
वाढीव भाड्यास नकार
टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावर दरवाढीचा सर्वाधिक परिणाम होत आहे. वाढीव भाडे देण्यास ग्राहक नकार देत आहेत. सरकारने इंधन दर वाढीवर निर्बंध घातले नाही, तर धंद्यावर नक्कीच टाच येईल.
- तेजस सांगळे, दादर.