फरार चंदनतस्करास अटक
By admin | Published: April 13, 2015 02:44 AM2015-04-13T02:44:51+5:302015-04-13T02:44:51+5:30
कॅफेपोसा अंतर्गत स्थानबद्ध कारवाई झालेल्या फरार चंदनतस्करास वाशी पोलिसांनी अटक केली आहे. १३२ मेट्रिक टन चंदनाचा साठा बाळगल्याप्रकरणी कस्टम
नवी मुंबई : कॅफेपोसा अंतर्गत स्थानबद्ध कारवाई झालेल्या फरार चंदनतस्करास वाशी पोलिसांनी अटक केली आहे. १३२ मेट्रिक टन चंदनाचा साठा बाळगल्याप्रकरणी कस्टम विभागाने जानेवारी २०१४मध्ये त्याला अटक केलेली. मात्र जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो फरार होता.
प्रमोद केळुसकर (४५) असे या चंदनतस्कराचे नाव आहे. प्रभादेवी येथे राहणाऱ्या प्रमोद याच्यावर जानेवारी २०१४मध्ये जेएनपीटी येथे कस्टमने कारवाई केलेली. या वेळी त्याच्याकडे १३२ मेट्रिक टन रक्तचंदन आढळून आलेले. या चंदनतस्करीप्रकरणी त्याला शिक्षा झाली असता तो जामिनावर जेलबाहेर आलेला. याचदरम्यान सप्टेंबर २०१४मध्येच राज्य गृहखात्याच्या मालमत्ता विभागाने त्याच्यावर कॅफेपोसा अंतर्गत स्थानबद्ध कारवाईचे आदेश काढलेले. राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली. प्रमोद केळुसकर हा अनेक वर्षांपासून चंदनतस्करीमध्ये सक्रिय असून, त्याला सन २००९ व २०१३मध्येदेखील अटक झालेली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा तो चंदनतस्करी करायचा. यामुळे त्याला कॅफेपोसा अंतर्गत नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्यात आलेले. परंतु जामिनावर तुरुंगाबाहेर निघाल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर शुक्रवारी दुपारी वाशी पोलिसांनी त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या ताब्यात दिले.
एक सराईत तस्कर वाशी पुलालगत येणार असल्याची गोपनीय माहिती उपनिरीक्षक देवीदास पालवे यांना मिळालेली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राम पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक सुरज पाडवी, सहायक निरीक्षक मारुती यमगर, उपनिरीक्षक पालवे, कर्मचारी उमेश पाटील, सुनील पवार, नीलेश शिंदे यांनी वाशी पुलालगत सापळा रचला होता.
या वेळी प्रमोद केळुसकर हा स्विफ्ट (एमएच-०५-एएस-८०९३) कारने तेथे आला असता त्याला पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी दिली.
त्याला अटक करून कॅफेपोसाच्या स्थानबद्ध कारवाईकरिता मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या ताब्यात दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास पालवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)