लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सराईत गुन्हेगारीसह विविध मादक पदार्थांच्या तस्करीतील माफिया सोनू पठाण याला अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) रविवारी मध्यरात्री अटक केली. मैत्रिणीला भेटण्यासाठी तो मुंबईत आला असताना पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
सोनू गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. तो डोंगरीतील पठाण गॅंगचा म्होरक्या असून, त्याच्यावर एनसीबीच्या तीन गुन्ह्यांसह अनेक गुन्हे दाखल असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी एनसीबीने डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणला अटक केल्यानंतर चौकशीत म्होरक्या सोनू पठाणचे नाव समोर आले होते. अनेक गुन्ह्यांत फरार असलेला सोनू मध्यरात्री आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोंगरी परिसरात सापळा लावून त्याला अटक केली. या ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला जानेवारीत एनसीबीने अटक केली होती.