नवी मुंबई : चिटफंड प्रकरणात अटकेत असताना जामीन मिळवून फरार झालेल्या सतीश गावंडला अखेर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर शुक्रवारी त्याला मध्ये प्रदेशमधून ताब्यात घेतलेaअसता शनिवारी नवी मुंबईत आणण्यात आले.
पनवेल, उरण परिसरातील नागरिकांना चिटफंडच्या माध्यमातून 400 कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली आहे. याप्रकरणी एका चिटफंडची प्रमुख सुप्रिया पाटील व तिचे सहकारी पोलिसांच्या अटकेत आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यातील चिटफंडचा प्रमुख सतीश गावंड उर्फ सुमित पटेल याला अटक केल्यानंतर त्याने न्यायालयातून जामिन मिळवून धूम ठोकली होती. यादरम्यान त्याने व्हिडीओ वायरल करून या प्रकरणात इतरही काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे संकेत दिले होते. शिवाय गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळतील असे आमिषही तो दाखवत होता. यामुळे काही गुंतवणूकदारांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.
दरम्यान पोलिसांनी सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांची संपत्ती जप्त करण्यावर जोर दिला आहे. दोघांची सुमारे 100 कोटींची संपत्ती अद्याप पर्यंत पोलिसांनी जप्त केली आहे. तर फरार असलेल्या गावंडच्या शोधासाठी देखील विविध पथके तयार केली होती. त्यामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने शुक्रवारी रात्री उशिरा त्याला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. शनिवारी त्याला नवी मुंबईत आणण्यात आले. त्याच्या अटकेनंतर या गुन्ह्यातली इतरही आवश्यक माहिती पोलिसांसमोर उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.