पुण्यातील फरार खुनी ठाण्यात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:22+5:302020-12-27T04:05:22+5:30
ठाणे : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि मकोकाखाली फरार असलेला आरोपी घोडबंदर भागात पोलिसांची गस्त सुरू असताना ...
ठाणे : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि मकोकाखाली फरार असलेला आरोपी घोडबंदर भागात पोलिसांची गस्त सुरू असताना आढळला आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जिंवत काडतूस सापडले. २०१८ मध्ये त्याच्या नावावर खुनाचा गुन्हा दाखल होता. अटक आरोपीचे नाव अभिमन्यू यादव (४४) असे आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध अवैध कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून, मिळालेल्या माहितीच्या आधारे घोडबंदर भागातील आनंदनगर बसस्टॉपजवळ अभिमन्यू यादव याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळले. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१८ च्या मकोका या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली नोंद असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्यावर आता अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तसेच या आरोपीवर मुंबई शहरामध्ये मारामारी व जुगार चालविण्याचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.