Join us

फरार परमबीर सिंह बेल्जियममध्ये, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 11:54 AM

Parambir Singh News: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागल्याचा दावा काँग्रेस नेते Sanjay Nirupam यांनी मोठा दावा केला आहे.

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मोठा दावा केला आहे. परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. मात्र परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये कसे पोहोचले आणि त्यांना कुणी मदत केली, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे.

बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप असलेल्या परमबीर सिंह यांच्याविरुद्ध मुंबईतील एका कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, परमबीर सिंह यांच्याबाबत निरुपम यांनी एकक ट्विट करत मोठा दावा केला आहे. त्यात ते म्हणतात की, हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. मंत्र्यांवर हप्ते वसुलीचा आरोप यांनी केला होता. मात्र ते स्वत: पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी सांगितले की, ते फरार आहेत. मात्र आता माहिती मिळतेय की ते बेल्जियममध्ये आहेत. ते बेल्जियममध्ये गेले कसे? त्यांना जाण्यासाठी सेफ पॅसेज कुणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाही का?

मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या अर्जावर कारवाई करताना मुंबईमधील एका न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंह यांच्याबरोबरच कोर्टाने विनय सिंह आणि रियाझ भाटी यांच्याविरोधातही अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच अँटिलिया बॉम्ब प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंह यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंह सुट्टीवर गेलेल होते. तसेच त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून परमबीर सिंह फरार आहेत. 

टॅग्स :परम बीर सिंगमुंबई पोलीससंजय निरुपम