‘बाजीराव’ची उणीव ‘सुलतान’ काढणार भरून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:10 AM2019-05-05T05:10:39+5:302019-05-05T05:12:06+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’ या पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी वार्धक्याने मृत्यू झाला. आता त्याची उणीव भरून काढण्यासाठी नागपूरमधील ‘सुलतान’ या वाघाचे उन्हाळ्यानंतर उद्यानात आगमन होणार आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’ या पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी वार्धक्याने मृत्यू झाला. आता त्याची उणीव भरून काढण्यासाठी नागपूरमधील ‘सुलतान’ या वाघाचे उन्हाळ्यानंतर उद्यानात आगमन होणार आहे. त्यासाठी उद्यान प्रशासन प्रयत्नशील आहे. सुलतान बंगाल टायगर प्रजातीचा आहे.
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या सहा वाघांचे वास्तव्य आहे. हे सर्व बंगाल टायगर या प्रजातीचे आहेत. उद्यान प्रशासनाकडून हंगामानुसार वाघांची निगा राखली जाते.
सहा वाघांपैकी आनंद व यश हे दोन नर वाघ असून, बसंती, लक्ष्मी, मस्तानी, बिजली अशा चार मादी आहेत. आनंद, यश व लक्ष्मी हे बसंती वाघिणीच्या पोटी जन्माला आले. आनंद व यशचे वय नऊ वर्षे असून, बसंती १६, लक्ष्मी नऊ, तर मस्तानी व बिजली आठ वर्षांच्या आहेत. मस्तानी व बिजली या दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत. भोपाळ वनविभागातून २००८ साली बसंती वाघिणीला, तर पेंच वनविभाग (नागपूर) येथून मस्तानी आणि बिजली यांना २०१६ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. आनंद, यश आणि लक्ष्मी जन्मच उद्यानात झाला आहेत.
येथील प्राणी रक्षक नामदेव झिरवे यांनी सांगितले की, वाघांसाठी देवनारवरून येणारे बीफ उद्यानातील पशुवैद्यक अधिकारी यांच्याकडून तपासणी करून, मग वन्य जिवांना खाण्यासाठी दिले जाते. दिवसातून एकदा सायंकाळच्या वेळी ८ ते १० किलो मांस या वाघांना देण्यात येते, तर आठवड्यातून एकदा म्हणजे, दर गुरुवारी आरोग्याच्या दृष्टीने वाघांना खाद्य दिले जात नाही. उद्यानामध्ये वाघांसाठी आठ पिंजरे व दोन डेन (बाळंतपणगृहे) आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या पिंजºयामध्ये ठेवले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना पिंजºयामध्ये पाइपद्वारे आंघोळ घातली जाते. सफारीमध्ये वाघांसाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आले असून, येथे गारव्यासाठी ते तासन्तास बसलेले पाहायला मिळतात.
हंगामानुसार निगा राखण्यास प्राधान्य
सेंट्रल झू अॅथोरिटी (दिल्ली)च्या सूचनेनुसार वन्य प्राण्यांची निगा राखली जाते. हवामानातील बदल, वाढते तापमान, प्रदूषण या बाबींचा वन्य जिवांवर होणारा विपरित परिणाम लक्षात घेता, हंगामानुसार वाघांची निगा राखली जाते. बाजीराव या पांढºया वाघाचा शुक्रवारी वार्धक्याने मृत्यू झाल्यानंतर नागपूरहून सुलतान या वाघाला येथे आणण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- संजय वाघमोडे, परिक्षेत्र वनअधिकारी,
व्याघ्र व सिंह विहार विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.