Join us

नयानगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 1:31 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्ग; शिवसेना भवनापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश

मुंबई : माहिम येथील नयानगर लाँचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यांतून दोन्हीही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रू) पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी दादर येथील शिवसेनाभवनापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात मेट्रो प्रशासनाला यश मिळाले आहे.कृष्णा १ आणि २ या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लाँचिंग शाफ्ट माहिम येथून अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १८ आॅक्टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर माहिमपासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर २,४९० मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा - १ या टीबीएमसाठी १,७७९ इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्जचा तर कृष्णा २ या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी २,४७२ मीटर भुयारीकरणासाठी १,७६६ इतक्या आरसीसी रिंग्जचा वापर करण्यात आला. कृष्णा १ व २ द्वारे सरासरी दररोज १० ते १२ मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या १०० जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया यांसारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णा १ आणि २ या हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीच्या टीबीएम मशिन्स आहेत. त्यांची लांबी १०८ मीटर असून त्या प्रत्येकी ४०० टन इतक्या वजनाच्या आहेत.याप्रसंगी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व १७ टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करीत आहेत; आणि १८ किमीपेक्षा अधिक म्हणजेच एकूण ३५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी नियोजित वेळेत म्हणजे २०२० पर्यंत आम्ही मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्वास आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई