मुंबई : दुचाकीचा भरधाव वेग मित्राच्या जिवावर बेतल्याची घटना बुधवारी पायधुनीत घडली. इराज राजुद्दीन खान (१९) याचा यामध्ये मृत्यू झाला आहे, तर दुचाकी चालक अरबाज उस्मानी (२८) हादेखील जखमी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.कुर्ला येथील विनोबा भावे नगर परिसरात उस्मानी राहतो. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने मित्रांसोबत खरेदीचा प्लान आखला. तसेच तो मित्र खानसोबत दुचाकीवरून सीएसएमटीच्या दिशेने खरेदीसाठी निघाला. त्याच्यासोबत अन्य दोन मित्रही दुचाकीने निघाले.भरधाव वेगामुळे जे.जे. उड्डाणपुलाजवळून सीएसएमटीकडे जाताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळून खाली कारवर कोसळली. यामध्ये मागे बसलेला खानचाजागीच मृत्यू झाला, तर उस्मानी जखमी झाला.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले. खानचे दुसऱ्या दुचाकीवर असलेले दोन मित्र अरबाज फखरे आलम शेख (२१) व शहनावज खान जखमी झाले आहेत. जे. जे. रुग्णालयातील उपचारानंतर अरबाजला घरी सोडण्यात आलेआहे.अपघातात कारचालक वैजनाथ कनोजिया यांच्या कारचे नुकसान झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उस्मानीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो उपचार घेत असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांनी दिली.
भरधाव वेग बेतला मित्राच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:36 AM