Join us

गोरेगावच्या ओबेरॉय जंक्शनवर झळकला पूर्ण प्रकाशित सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग हा नेहमी एक गजबजलेला आणि मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग हा नेहमी एक गजबजलेला आणि मुख्य रस्ता आहे. आता या जंक्शनवर उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळीप्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल यंत्रणा येथे आज संध्याकाळी कार्यान्वित झाली आणि हा परिसर जणू रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला. येथे सिग्नल लागतच स्थानिकांनी येथे भेट दिली.

वरळी येथील पूर्ण प्रकाशित सिग्नल यंत्रणा एकदिश (Uni direction) संकल्पनेचा आधार घेऊन बनलेली आहे. त्यात अधिक तांत्रिक तपशील वाढवून बहुदिश (Multi Directional illumination) प्रकारातील हा मुंबई शहरातील पहिलाच प्रयोग आहे.

शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशी विधानसभेचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या पाठपुराव्याने काल रात्री बहुदिश सिग्नल यंत्रणेचे इन्स्टालेशन पूर्ण झाले. ओबेरॉय जंक्शन येथील गोरेगावकडून दिंडीशीकडे जाणाऱ्या अग्निशमन केंद्रालगत

बसवलेला हा पश्चिम उपनगरातील पहिला पायलट प्रोजेक्ट आहे. तर दिंडोशीकडून गोरगावकडे जाणाऱ्या या लोकेशनवर विरुद्ध दिशेला येथील दुसऱ्या बहुदिश सिग्नल यंत्रणेचे काम सुरू झाल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली.

स्थापत्य समिती उपनगरे व शिवसेना नगरसेवक स्वप्निल टेंबवळकर यांचेसुद्धा या योजनेला सहकार्य लाभले.

लोकमतने सदर प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर २८ एप्रिल रोजी लोकमत ऑनलाईन आणि २९ रोजी लोकमतमध्ये सर्वप्रथम सदर वृत्त दिले होते.

येथील ओबेरॉय मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात. त्यामुळे नेहमी पादचारी व वाहनांची गर्दी असते. अशा वेळी सिग्नल पाहून रस्ता ओलांडणे कठीण असून अनेक वेळा सिग्नल दिसत नाही. त्यामुळे वरळीप्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे केली होती.

याबाबत पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डच्या मेंटेनन्स खात्याचे सहायक अभियंता ओमकार गिरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम पूर्ण झाले आहे. या करिता कार्यकारी अभियंता (एटीसी) खात्याचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले. या पायलट प्रकल्पाचे निरीक्षण करून त्यात अधिक तांत्रिक बाजूंचा विस्तार करणे आता शक्य होणार आहे.

या प्रकल्पानंतर श्यामजी बापू चौक येथे स्मार्ट सिग्नल पोलच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, चार डेकोरेटिव्ह लाईट असतील. विशेष म्हणजे हा स्मार्ट डेकोरेटिव्ह पोल वायफायने जोडला जाईल आणि त्यांचे नियंत्रण पी दक्षिण वॉर्डमध्ये असेल. जर पालिकेला कोणती महत्त्वाची सूचना नागरिकांना द्यायची असेल ती डिजिटलच्या माध्यमातून देता येईल, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी शेवटी दिली.