मजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:44 AM2019-01-19T05:44:00+5:302019-01-19T09:47:53+5:30

काळ्या शर्टामुळे अडकला जाळ्यात, पोलिसांनी महिला प्रवासी बनूनच घेतला शोध

As a fun, it was 'women' on women's bodies | मजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल

मजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल

Next

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल टाकणाºया विकृताचा काळा शर्ट सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याच काळ्या शर्टाचा धागा पकडत, रेल्वेच्या ‘निर्भया पथका’ने महिला प्रवासी बनून सापळा रचला. शुक्रवारी तोच काळा शर्ट घालून महिलेच्या अंगावर केमिकल टाकण्याच्या बेतात असताना, पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. रणवीर चौधरी (२४) असे अटक आरोपीचे नाव असून, केवळ मजा म्हणून तो हा प्रकार करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या चौधरीने कामानिमित्त मुंबई गाठली. चांदिवलीत काही मित्रांसोबत तो राहतो. मित्रांच्याच ओळखीतून त्याला लोअर परळ परिसरातील फर्निचरच्या दुकानात नोकरी मिळाली. नोकरीनिमित्त तो अंधेरी ते लोअर परळ रेल्वे प्रवास करीत असे. अंधेरी मेट्रोच्या पुलावरून रेल्वे स्थानकाकडे येणाºया गर्दीतूनच तो रोज ये-जा करीत असे. दरम्यान, फर्निचरच्या दुकानातील फेवी क्वीकची मोठी बाटली तो स्वत:सोबत ठेवू लागला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच पुलावर रेल्वे प्रवास करणाºया महिलेच्या पार्श्वभागावर त्याने फेविक्विक फेकले. केमिकलमुळे जळजळ होताच तिने आरडाओरडा करीत कपडे झटकण्यास सुरुवात केली. तिच्या हालचाली तो पाहत होता. गर्दीमुळे आपण कुणाच्याही जाळ्यात येणार नाही याची तसेच सीसीटीव्हीतही कैद होऊ नये याची तो काळजी घेत असे. डिसेंबरमध्येच त्याने आणखी एका महिलेवर फेविक्विक फेकले आणि आडोसा घेत पुढे काय होतेय हे पाहू लागला.
जानेवारीत लागोपाठ दोन महिलांवर अशा प्रकारे त्याने फेविक्विक उडविले. या प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये दहशत पसरली. शुक्रवारी ‘लोकमत’ने याबाबतच्या घटनेला वाचा फोडली.

पोलीस शोध घेत असतानाच शेवटच्या प्रयत्नावेळीचे त्याचे शर्ट रेल्वे पोलिसांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. हाच धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र एवढ्या गर्दीतून केवळ शर्टाच्या आधारे त्याचा शोध घेणे रेल्वे पोलिसांसाठी आव्हान होते.

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी स्टेशन ब्रांचचे पोलीस अंमलदार सुदर्शन बल्लाळ, मंगेश घाडीगावकर, संतोष राणे, प्रमोद तोडणकर यांच्यासह निर्भया पथकाने या विकृताला पकडण्यासाठी सापळा रचला. शुक्रवारी तोच शर्ट घालून त्याने स्टेशन गाठले. तपास पथकाने त्याला हेरले. अंधेरी रेल्वे पोलिसांच्या निर्भया पथकातील अंमलदार सुधा खवणेकर, शीला हिरवे, मंजुला खरात, अवंतिका सुर्वे, मीनाक्षी गावित, सारिका जाधव, नीता वरेकर, रंजना सुरवाडी आणि वनिता डोके यांनी महिला प्रवासी बनून त्याला बेड्या ठोकल्या.

मजा म्हणून केले कृत्य

चौधरीच्या चौकशीत केवळ मजा आणि मानसिक समाधान म्हणून महिलांच्या अंगावर फेविक्विक फेकत असल्याचे चौधरीने सांगितले. त्याचा मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

५ं७ गुन्हे उघडकीस

चौधरीविरुद्ध अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात ५, बोरीवलीत १ तर अंधेरी पोलीस ठाण्यात १ असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title: As a fun, it was 'women' on women's bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.