क्षेपणभूमीच्या विकासासाठी निधी
By admin | Published: December 5, 2014 12:26 AM2014-12-05T00:26:22+5:302014-12-05T00:26:22+5:30
तुर्भे येथील महापालिकेच्या क्षेपणभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नवी मुंबई : तुर्भे येथील महापालिकेच्या क्षेपणभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी ही माहिती दिली. आयुक्तांनी तुर्भे येथील जमीनभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी तेथील कार्यपद्धतीची तसेच खत व फ्युअल पॅलेट्स निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
महानगरपालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीची प्रशंसा देशी-परदेशातील अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. घनकचरा प्रक्रि या प्रकल्प व विल्हेवाटीची जागा ही एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे विकसित करून हा प्रकल्प अधिक आगळावेगळा व उल्लेखनीय ठरावा या दृष्टीने संपूर्ण जागेचा एकत्रित आराखडा तयार करु न त्यामध्ये लॉन लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रकल्पाच्या सभोवताली सरळ वाढणारी व खोलवर मुळे जाणारी उंच झाडे (ट्री बॅरिअर) लावावीत, तसेच प्रकल्पाच्या आतील भागात शास्त्रोक्त पध्दतीने बंद केलेल्या सेलच्या सभोवताली आखूड मुळांची, शोभेची आणि फुलांची झाडे-झुडपे लावावीत, जेणेकरून विविध प्रजातींची फुलपाखरे आकर्षित होतील. तेथील सौंदर्यात भर पडतानाच जैववैविध्यही वाढेल, सूचनाही जऱ्हाड यांनी यावेळी केल्या. त्या परिसरात आवश्यक ठिकाणी रस्ते बांधणे व लक्ष ठेवण्याकरिता सर्वात उंच जागी मनोरा उभारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण कामाकरिता स्मार्ट सिटीअंतर्गत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)