शिक्षणात व्हावे पायाभूत परिवर्तन!
By Admin | Published: January 1, 2015 11:10 PM2015-01-01T23:10:37+5:302015-01-01T23:10:37+5:30
समाजवृक्ष बहरायला हवा असेल, तर त्याच्या मुळांना बालशिक्षण व प्राथमिक शिक्षणाचे खतपाणी घालून त्याची जोपासना करणे अपरिहार्य आहे
एखादा वृक्ष बहरण्यासाठी सुरूवातीपासूनच त्याला खत-पाणी मिळण्याची गरज असते. समाजवृक्ष बहरायला हवा असेल, तर त्याच्या मुळांना बालशिक्षण व प्राथमिक शिक्षणाचे खतपाणी घालून त्याची जोपासना करणे अपरिहार्य आहे. एकूणच प्रचलित शिक्षणपद्धतीत पायाभूत बदल करणे गरजेचे आहे. २०१५ वर्षात या दृष्टीने विचारपूर्वक ुपावले उचलली तरच भविष्याकडून काही अपेक्षा करता येतील.
साऱ्या शिक्षणाचा पाया आहे तो शालेय शिक्षण. प्रत्येक प्रौढ व्यक्तीची प्रगल्भता, त्याचे आचार-विचार-क्षमता या त्याला बालवयात मिळणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात. या गोष्टी सर्व मुलांना, सर्व ठिकाणी मिळाव्यात म्हणून व्यवस्था निर्माण करायला हवी.
शास्त्रीय बाालशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि रचनावादी गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण यांवर २०१५ सालात भर दिला जावा; यामुळे देशाच्या भविष्याबद्दल आश्वासक परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
१४ व्या वर्षापर्यंतच्या शिक्षणात, बालशिक्षण व प्राथमिक शिक्षण या दोन्हींचा समावेश असतो. परंतु दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. प्राथमिक शिक्षण हे, लेखन-वाचन-गणन कौशल्ये विकसित करते. विविध विषयांमधील ज्ञान प्राप्त करून घेण्याचे हे औपचारिक शिक्षण आहे. तर बालशिक्षण हे अनौपचारिक पद्धतींनी, सहज शिक्षणाच्या साहाय्याने होणारे मूलभूत मानवी क्षमतांच्या विकासाचे क्षेत्र आहे. बालशिक्षणाचे वय हे बालकाच्या वेगाने होणाऱ्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक विकासाचे वय आहे. त्याच्या मेंदूच्या घडणीचे वय आहे. त्यामुळे त्याच्या विकासास पूरक शिक्षण द्यावे लागते. अशा विकासोन्मुख व मेंदूवर आधारित शिक्षणाला शास्त्रीय बालशिक्षण म्हणतात. असे शास्त्रीय शिक्षण सर्वांना मिळणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पातळीवर व राज्यस्तरावर शास्त्रीय बालशिक्षणाचे नेटके धोरण आखले गेले पाहिजे.
राज्य स्तरावर शास्त्रीय बालशिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची जबाबदारी पार पाडणारे बालशिक्षण व्यवहारातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींचे, स्वायत्त ‘बालशिक्षण मंडळ’ कायद्याने निर्माण करावे. बालशिक्षणात पाटी-पुस्तके-वह्या-बाके अशा कोणत्याच गोष्टी लागत नाहीत; मात्र विविध, वयानुरुप अशी शैक्षणिक साधने मुबलक असावी लागतात. त्यासाठी व शिक्षकांच्या शास्त्रीय प्रशिक्षणासाठी मोठी गुंतवणूक केली जावी. महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय समितीने (राम जोशी समिती) १९९६ साली दिलेला अहवाल आजही उपयुक्त ठरू शकेल. महाराष्ट्र सरकारने बालशिक्षणात काही पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या वर्षात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
औपचारिक प्राथमिक शिक्षण हे २००९ सालच्या ‘शिक्षण हक्क कायद्या’ने सुत्रात बांधले आहे. २००५च्या ‘राष्ट्रीय शिक्षणक्रम मसुद्या’ने ‘ज्ञानरचनावादी’ शिक्षणाची मुहूर्तमेढही रोवली आहे. अशाप्रकारच्या बालककेंद्री शिक्षणाची अंमलाजावणीही सुरू झालीच आहे. त्याच्या गती आणि प्रगतीसाठी पुढील गोष्टी येत्या वर्षात घडल्या पाहिजेत.
सर्व सरकारी आणि खासगी सर्वभाषिक शाळांमधून शिक्षणाचे ज्ञानरचनावादी पद्धतींत परिवर्तन करण्यासाठी बळकट यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या आणि विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या मदतीने उभारणे गरजेचे आहे.
शिक्षणात पायाभूत परिवर्तन सार्वत्रिकरित्या करायचे असेल तर एकूण समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. शासनाने यासाठी व्यापक मोहीम उघडणे उपयुक्त ठरेल.
- प्रा. रमेश पानसे