‘कमवा आणि शिका’चा मूलमंत्र देणारी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:01 AM2020-03-09T01:01:00+5:302020-03-09T01:01:51+5:30

घाटकोपरचे एस.एस.एस. मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल : ज्ञानरचनावादी, कृतियुक्त पद्धतीचा अवलंब करत मिळते आनंददायी शिक्षण

The fundamentals of 'Earn and Learn' | ‘कमवा आणि शिका’चा मूलमंत्र देणारी शाळा

‘कमवा आणि शिका’चा मूलमंत्र देणारी शाळा

googlenewsNext

सीमा महांगडे

मध्यमवर्गीय, गरीब,गरजू गिरणी कामगारांच्या मुलांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वयंरोजगार देण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक दिवं. डॉ.अंकुश शंकर गावडे यांनी १९६१ साली घाटकोपर येथील पंतनगर विभागात शिक्षण संस्था स्थापन केली. याच संकुलात मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागास सुरुवात झाली. १९७५ सालापासून कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या अंतर्गत वाणिज्य, विज्ञान, बायफोकल सायन्स, एच.एस.सी. व्होकेशनल (एम.सी.व्ही.सी.) या शाखांचा समावेश आहे.

प्रशस्त वास्तू व भव्य पटांगण हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य. अत्याधुनिक वर्गखोल्या, प्रशस्त ग्रंथालय, प्रयोगशाळा, आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निसंरक्षण यंत्रणा, सुरक्षिततेसाठी सर्वत्र कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शाळेने २००४ पासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले व २०१३ पासून रात्र पदवी महाविद्यालयास सुरुवात केली. त्यानंतर, २०१६ पासून रात्र उच्च माध्यमिक विभाग सुरू करण्यात आले. २०१७ पासून पदवी व्यवसायाभिमुख (बी.व्होक) शिक्षण सुरू झाले आणि यातूनच ‘कमवा आणि शिका’ हा मूलमंत्र विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. आज या संस्थेत ४,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

ज्ञानरचनावादी, कृतियुक्त विद्यार्थी केंद्रीत पद्धतीचा अवलंब करत, आनंददायी शिक्षण संस्थेत दिले जाते. बंदिस्त वर्गाच्या चौकटीत न राहता, प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमार्फत विद्यार्थ्यांना पर्यावरण भेट, औद्योगिक क्षेत्र भेट, ऐतिहासिक शैक्षणिक सहली, तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘एशियाटिक’ ग्रंथालयास भेट देण्याची संधी मिळते.

संस्थेमार्फत शिक्षकांसाठी ‘ताणतणावाचे व्यवस्थापन, तंत्रस्नेही ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती’ यासारख्या कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी ३१ डिसेंबरला केले जाते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘आयटीत मराठी ऐटीत मराठी’ या कार्यशाळेचे आयोजन शिक्षकांसाठी केले जाते. शिक्षकांसह मुख्याध्यापक, तसेच संस्थेचे पदाधिकारी सतत नवे उपक्रम राबवत असतात. संस्थापक डॉ.अंकुश शंकर गावडे यांच्या निस्वार्थ सेवावृत्तीने प्रभावित होऊन त्यांच्यापश्चात ही विचारधारा अव्याहतपणे चालविणाऱ्या आजच्या संचालक मंडळाने संस्थेचा वटवृक्ष समर्थपणे सांभाळला. अशा या संस्थेची धुरा संस्थेचे अध्यक्ष वि.गो.गावडे, कार्याध्यक्ष श.रा.फाटक, चिटणीस नं.पुं.नरे, खजिनदार वि.म.फाटक यांच्यासह सर्व सभासदांनी यशस्वीरीत्या उचलली आहे. सर्व विभागांचे कार्यदक्ष मुख्याध्यापक व अधिकारी वर्ग, मेहनती व प्रशिक्षित शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.

प्रेरणादायी उपक्रम - ‘राहुटी’ या उपक्रमातून भारतातील विविध राज्यांच्या लोकजीवन व संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. ‘शैक्षणिक जत्रा’अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. यामध्ये पालकांचे सहकार्य लाभते. दहीहंडी, वृक्षदिंडी, गणेशोत्सव प्रभात प्रबोधन फेरी, राष्ट्रीय सण, उत्सव व त्यांचे आपल्या जीवनातील सांस्कृतिक महत्त्व, यातून संस्कारक्षम व सुशिक्षित विद्यार्थी घडावेत हा दृष्टिकोन आहे. माजी विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना केल्या जाणाºया सहकार्यातून याची प्रचिती येते. स्थानिक पोलीस विभागामार्फत वाहतूक सुरक्षितता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक सुरक्षितता, तसेच व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘स्वतंत्र मूलभूत भाषिक कौशल्य संपादणूक वर्ग’ वर्षभर, तसेच विशेष अभ्यासिका वर्ग, पूरक मार्गदर्शन वर्ग एप्रिलमध्ये होतात. घरगुती विजेच्या उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन त्याचा उपयोग विद्यार्थी दैनंदिन जीवनात करत आहेत.तसेच बँड स्काउट गाइड, लेझीम पथकातही विद्यार्थी अग्रेसर आहेत. साक्षरता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी ‘प्रौढ साक्षरता वर्ग’ चालवितात. या वर्षीपासून शाळेत ‘शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून’ या उपक्रमास सुरुवात झाली आहे. वर्गनिहाय, विषयनिहाय प्रश्नावली विद्यार्थ्यांना देऊन मुद्द्यांनुसार स्तरनिश्चिती केली जाते. त्यानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याचे मत वैयक्तिकरीत्या मुख्याध्यापकांकडे पोहोचते व आवश्यकतेनुसार बदल करण्याचा विचार शिक्षकांपर्यंत पोहोचविला जातो.


विविध उपक्रमांच्या सुखद अनुभवांचे थेट प्रक्षेपण प्रसार माध्यमांमार्फत नेहमी प्रसारित केले जाते. नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कार्यतत्पर असतात, तसेच यापुढेही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितकारक असणारे नवनवीन उपक्रमांचे प्रयोग करण्यास आम्ही तत्पर असू. - फरिदा खलील अहंमद सनदे, मुख्याध्यापिका

Web Title: The fundamentals of 'Earn and Learn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा