Join us  

महाड नगरपरिषदेच्या इमारतीसाठी निधी देणार

By admin | Published: June 23, 2014 3:09 AM

नगरपरिषदेचे प्रशासकीय भवन उभारण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी या प्रशासकीय भवनच्या इमारतीसाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली

महाड : माजी नगराध्यक्ष स्व. अण्णासाहेब सावंत यांचे महाडच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून शिवाजी चौकातील जागेमध्ये नगरपरिषदेचे प्रशासकीय भवन उभारण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी या प्रशासकीय भवनच्या इमारतीसाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री तथा रायगड पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिली. महाड नगरपरिषदेच्या विविध कामाचा शुभारंभ तसेच झालेल्या कामाची उद्घाटने तटकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. यानिमित्त म. फुले सभागृहात झालेल्या सभेत तटकरे यांनी बोलताना शिवसेना नेत्यांनी मंत्री होण्याची स्वप्ने पाहू नयेत असा टोलाही सेना आमदार भरत गोगावले यांना त्यांचे नाव न घेताना लगावला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. माणिक जगताप होते.तटकरे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपला पराभव आपण स्वीकारला आहे. पराभव हा पराभवच. तो किती मतांनी झाला याला महत्त्व नाही. मुंबईसह संपूर्ण कोकणातील १३ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. या सर्वांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला तरी आपण पुन्हा त्याच जिद्दीने कामाला लागलो आहोत. मतदारांनी आम्हाला नाकारलं नाही तर मोदींना स्वीकारले अशी भावनाही तटकरे यांनी व्यक्त करताना मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी मोंदीचे नाव वगळून तुमची काय अवस्था होईल त्याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही तटकरे यांनी दिला. शहरातील विविध विकासकामांचे तटकरे यांनी कौतुक केले. शहर विकासासाठी यापुढे न. प. ला निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही देखील तटकरे यांनी दिली. (वार्ताहर)