निधी अपहार प्रकरण : तिस्ता सेटलवाड यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:31 AM2018-04-06T05:31:41+5:302018-04-06T05:31:41+5:30
स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई - स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने तिस्ता सेटलवाड व आनंद यांनी उच्च न्यायालायत धाव घेतली. न्यायालयाने या दोघांनाही २ मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना गुरुवारी दिले.
तिस्ता सेटलवाड व जावेद आनंद यांना अंतरिम दिलासा देताना न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी या दोघांनाही तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले.
सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने २००८ व २०१३ या काळात केंद्र सरकारची फसवणूक करून १.४ कोटी रुपये मिळवले. हा निधी गुजरात व महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व २००२ च्या गोध्रा हत्याकांडातील पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी या संस्थेला देण्यात आला होता. मात्र, हा निधी अन्य कारणासाठी वापरण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सेटलवाड व आनंद यांच्यावर भारतीय दंडसंहिता ४०३, ४०६ आणि ४०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने या दोघांवरही गुन्हा नोंदविल्याने तेथील न्यायालयात पोहोचेपर्यंत आपल्याला अटक करण्यात येईल, या भीतीने या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
हे दोघेही स्वत:हून चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. शुक्रवारीच तपास यंत्रणेसमोर हजर राहतील. तेथील न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवेपर्यंत उच्च न्यायालयाने त्यांचा ट्रान्झिट जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती या दोघांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत शुक्रवारी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यास सांगितले.