Join us

चैत्‍यभूमी स्‍मारकासाठीचा २९ कोटी रुपयांचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 4:34 AM

अहवाल सादर करा : स्‍थायी समिती अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्‍य शासनाकडून २००२ पासून ते २०१४ पर्यंत २१ कोटी रुपये निधी व त्‍यावर आतापर्यंत ८ कोटी रुपये व्‍याज असा एकूण २९ कोटी रुपयांचा निधी मुंबई महापालिकेकडे दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्‍यभूमी स्‍मारकाची दुरुस्‍ती व सुशोभीकरणासाठी जमा झाला आहे. या निधीतून चैत्‍यभूमीचा विकास, दुरुस्‍ती व सुशोभीकरणासाठी आराखडा, संकल्‍पचित्र तयार करून तातडीने हे काम हाती घ्‍यावे. पुढील बैठकीत कामाचा अहवाल प्रशासनाने सादर करावा, असे निर्देश स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी स्‍थायी समितीच्‍या बैठकीत दिले.

अखर्चित असलेल्‍या निधीतून खर्च करण्‍यासाठी तीन महिन्‍यांपूर्वीच प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र विकासकामे हाती घेण्‍यात आलेली नसून प्रशासनाकडून उत्तर प्राप्‍त झालेले नाही. महापरिनिर्वाणदिनासाठी यापूर्वी अर्थसंकल्‍पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात येत होती. यामध्‍ये वाढ करण्‍याचे निर्देश दिले होते. त्‍यानुसार अर्थसंकल्‍पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली. यावर्षी ही तरतूद साडेचार कोटी रुपयांची करण्‍यात आली. संरक्षक भिंतीचे काम व लगतच्‍या स्‍मशानभूमीचा काही भाग सुशोभित करण्‍याचे निर्देशही जाधव यांनी दिले.