मुंबई : एसटी महामंडळाच्या साडेसात हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपये देणे थकीत असून, अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत. ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला निधी द्यावा, असे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही.
भाई जगताप म्हणाले की, आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणले जाते. तरीही २०१८ पासून ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व निवृत्त कामगारांना व अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.
संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडे साथ हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षांत ७१ पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे.