कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:11+5:302021-01-21T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना, अनेक मृतदेह अंत्यसंस्काराविना शवागृहात पडून राहत होते. अखेर महापालिकेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना, अनेक मृतदेह अंत्यसंस्काराविना शवागृहात पडून राहत होते. अखेर महापालिकेने प्रत्येक मृतदेह हाताळण्यासाठी पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र अनेक ठिकाणी नि:स्वार्थी भावनेने काही कर्मचाऱ्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. दक्षिण मुंबईतील स्मशानभूमी - कब्रस्थानमध्ये अविरतपणे काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकताच केला.
कोरोना काळामध्ये स्मशानभूमी तसेच कब्रस्तानमध्ये कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करणारे कर्मचारी हे खरे कर्मयोगी आहेत. त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत ११ हजार २५७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनाच्या सुरुवातीला एप्रिल-मे महिन्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे मृतदेह अंत्यसंस्काराविना पालिका रुग्णालयांमध्येच पडून राहत होते. कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने नातेवाईकांनाही मृतदेह दिले जात नव्हते. बॉडीबॅगमध्ये मृतदेह बंदिस्त करून ठेवले जात होते. मात्र अधिक काळ मृतदेह त्याच ठिकाणी राहिल्यास रोगराई पसरण्याचा धोकाही व्यक्त केला जात होता.
अशावेळी काही कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन मृतदेह हाताळण्याचे काम केले. या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना महापौरांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. दक्षिण मुंबईतील या कर्मचाऱ्यांचा सत्कार हा प्रातिनिधिक स्वरूपातील असला, तरी संपूर्ण मुंबईतील स्मशानभूमी-कब्रस्थान व इतर धर्मियांच्या स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्या सर्वांचा सत्कार करणे आवश्यक असल्याचे मत महापौरांनी यावेळी व्यक्त केले.
...........................