Join us

पंढरपूर अपघातातील मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 7:16 AM

अक्कलकोट येथे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले असता, वाटेतच झालेल्या अपघातात कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर काळाने झडप घातली.

मुंबई : अक्कलकोट येथे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले असता, वाटेतच झालेल्या अपघातात कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. या अपघातात कोकणे कुटुंबातील चार जणांचा, तर सावंत कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. यात कोकणे कुटुंबातील कर्ता आधार हिरावल्यामुळे संपूर्ण भटवाडी शोकसागरात बुडाली. दुपारी अडीचच्या सुमारास या सर्वांचे मृतदेह भटवाडीत आणण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नेहमी गोतावळ्यात वावरणाऱ्या या कुटुंबातील सहा जणांवर काळाने घाला घातला.सुरेश कोकणे यांचा श्री लक्ष्मी कॅटरर्सचा व्यवसाय असून, घाटकोपर येथील बर्वेनगरमधील भटवाडीत कार्यालय आहे. तेथेच कोकणे यांचे व्यवसायिक दुकान आहे. मूळ पुण्याच्या घोडेगावातील असणारे कोकणे आपल्या एकत्र कुटुंबात राहत होते. गुरुवारी सकाळी हे सर्व मारुती इको कारने अक्कलकोटला गेले होते. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. पंढरपूरपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात सुरेश रामचंद्र कोकणे (६०), सचिन सुरेश कोकणे (४१), सविता सचिन कोकणे (३६), श्रद्धा राजेंद्र सावंत (३८) व प्रथम राजेंद्र सावंत (१६) यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच आर्यन सचिन कोकणे (१२) व धनश्री सुरेश सावंत (१९) हे दोघे जखमी अवस्थेत कारमध्येच होते. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवून घेऊन त्यातून आर्यन आणि धनश्रीला उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले, परंतु उपचारासाठी नेत असतानाच आर्यनचा वाटेत मृत्यू झाला. मृतांपैकी आर्यन इयत्ता सातवीत, तर त्याचा भाऊ प्रथम दहावीची परीक्षा देणार होता.रविवारी दुपारी सोलापूर येथून दोन रुग्णवाहिकांमधून हे मृतदेह घाटकोपरमध्ये आणण्यात आले. कोकणे कुटुंबाच्या घराबाहेर सहा जणांच्या अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली होती. क्षणाक्षणाला घराच्या बाहेर गर्दी वाढत होती. सायंकाळी एकाच ट्रकवर हे सहाही पार्थिव ठेवण्यात आले. तेथून स्मशानभूमी कडे घेऊन जाऊन सायंकाळी ४ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :मृत्यूमुंबई