सय्यद अहमद यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Published: September 29, 2015 02:02 AM2015-09-29T02:02:29+5:302015-09-29T02:02:29+5:30
मणिपूरचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद यांच्यावर माझगाव येथील कब्रस्तान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : मणिपूरचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद यांच्यावर माझगाव येथील कब्रस्तान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपाडा मतदारसंघातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले सय्यद उत्तम लेखक आणि कवी होते. त्यांनी रविवारी मुंबईत अंतिम श्वास घेतला. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मणिपूरचे आरोग्यमंत्री हेमोचंद्र सिंग, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
दीर्घकाळ मुंबईतील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अहमद १९७७ पासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. १६ मे २०१५ रोजी मणिपूरचे सोळावे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. तत्पूर्वी २०११ ते १५ दरम्यान झारखंडचे आठवे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सय्यद यांच्या निधनाबद्दल सरकारने एकदिवसाचा दुखवटा जाहीर केला.
सैय्यद अहमद यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. ते उत्तम साहित्यिक होते, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.