भिवंडीत ८८४ धोकादायक इमारती
By admin | Published: June 15, 2014 11:55 PM2014-06-15T23:55:13+5:302014-06-15T23:55:13+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील पाच प्रभागांत एकूण ८८४ धोकादायक इमारती असून त्यापैकी प्रभाग समिती क्र.५ मध्ये १५३ अतिधोकादायक इमारती असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील पाच प्रभागांत एकूण ८८४ धोकादायक इमारती असून त्यापैकी प्रभाग समिती क्र.५ मध्ये १५३ अतिधोकादायक इमारती असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, मनपाने जाहीर केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटला नागरिकांनी प्रतिसाद न दिल्याने धोकादायक इमारतींंत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे आॅडिट करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले़ मात्र, ३० वर्षांपूर्वीच्या अवधीतील इमारतींचे रेकॉर्ड पालिकेने स्वत: ठेवले नाही. त्यामुळे शहरातील अशा मालमत्ताधारकांना नोटिसा बजावता आलेल्या नाहीत. तसेच जुन्या इमारतींचे सर्वेक्षण न करता भूभाग लिपिकांकडून मिळालेल्या माहितीवरून धोकादायक इमारती ठरवल्या जात आहेत.
वास्तविक, शहरात यापेक्षा जास्त धोकादायक इमारती असून त्यांंचा सर्व्हे झाल्यास भविष्यात इमारत कोसळण्याच्या घटना टाळता येतील. तसेच ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या घरमालकांनादेखील स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे केले तर धोकादायक इमारतींचा खरा आकडा कळू शकेल. परंतु, मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांचे लक्ष नवीन इमारती बांधण्याकडे आहे.
(प्रतिनिधी)