लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईला लाभलेल्या सागरी क्षेत्रात पर्यटन सुविधा निर्माण करून महसूल वाढविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कान्होजी आंग्रे बेट (खांदेरी) पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येत आहे. एप्रिलमध्ये खांदेरी पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळा लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कान्होजी आंग्रे बेटांवरील नव्या सुविधांचे उद्घाटन करण्याचा पोर्ट ट्रस्टचा मानस होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
गेटवे ऑफ इंडियापासून अवघ्या २३ किमी अंतरावर असलेल्या कान्होजी आंग्रे बेटावर पर्यटन सुविधा निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात महसूलनिर्मिती होऊ शकेल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टला आहे. त्यामुळेच या बेटावर मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शिवाय येथे पर्यटन सुविधा पुरवणाऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ''उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नव्हती. त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलला असे म्हणता येणार नाही. या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.''
.............
तात्पुरत्या सुविधा...
किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) काद्यानुसार भरती क्षेत्राच्या ५०० मीटरच्या आत नवीन बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सध्या येथे कोणतीही कायम रचना उभी केली जाऊ शकत नाही. कान्होजी आंग्रे हे लहान बेट असल्याने बफर झोन कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तोपर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या सुविधा निर्माण केल्या जातील, असे मुंबई पोर्ट ट्रस्टमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.